काही चीनी नागरिक आणि त्यांच्या भारतीय सहकार्यांवर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. यामध्ये 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक हवाला व्यवहार केल्याचे उघड झाल्याचे समजते. गुप्त माहितीनुसार आयकर विभागाने दिल्ली आणि एनसीआर भागात कोणालाही कळू न देता एकाचवेळी छापे टाकले.
या कंपन्यांकडून पैशांची अफरातफर होत होती. या रॅकेटमध्ये काही चिनी नागरिक, त्यांचे भारतीय सहकारी आणि बँक कर्मचारीदेखील सहभागी होते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने मंगळवारी रात्री उशीरा ही माहिती दिली. आयकर विभागाने दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्रामच्या 21 ठिकाणांवर छापेमारी केली. सीबीडीटीने कंपन्यांचे नाव उघड केले नसून रक्कम पाहता यामध्ये चीनच्या मोठ्या कंपन्या असण्याची शक्यता आहे. सीबीडीटीने मारलेल्या छाप्यात हवाला व्यवहार आणि पैशांची अफरातफर करण्यात आल्याचे कागदपत्र जप्त केले आहेत. सुरुवातीला तपासात 300 कोटींच्या हवाला व्यवहाराचा खुलासा झाला होता. मात्र, हा आकडा 1000 कोटींपेक्षाही जास्त आहे. याचा अर्थ तपासामध्ये आणखी काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या चौकशीत असे समोर आले आहे की, चिनी नागरिकांच्या आदेशावर बनावट कंपन्यांचे 40 हून अधिक बँक खाती आहेत. त्यामध्ये 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली होती.